गोष्ट हरिश्चंद्रगडावरची- अकोल्याचे ते तीन मित्र ❤

HARISHCHANDRA GAD

हरिश्चंद्र गड

Type - Hill Fort
District - ahmednagar
Height -4665 ft
Base village - Khireshwar, Pachnai.
Grade - medium


हरिश्चंद्रगडावर जाण्याचे 3 मार्ग आहेत पाचनई, खिरेश्वर आणि नळीची वाट. पाचनई मार्ग हा अत्यंत सोप्पा मार्ग आहे (कसारा मार्गे) या मार्गाने 1-2 तासात आपण गडावर पोहचतो, खिरेश्वर मार्ग(माळशेज मार्गे)हा मध्यम ते कठीण आहे या मार्गाद्वारे 5-6 तास लागतात तर नळीची वाट हा कठीण मार्ग आहे या मार्गाद्वारे 8-10 तास लागतात. हरिश्चंद्रगडावर पाहण्यासारखे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर, पुष्करणी, शिवलिंग, तारामती शिखर, कोकणकडा, रोहिदास शिखर अशी मनमोहक ठिकाणे आहेत.

गेल्या वेळी कळसुबाई शिखर सर केल्यानंतर आता हरिश्चंद्रगड सर करायचे ठरवले होते, हरिश्चंद्रगडाचे अफाट  सौंदर्य , कोकणकड्याचे मनमोहक असे दृश्य पाहुन ते सर करायची उत्कंठा शिगेला गेली होती, हरिश्चंद्रगड सर करायचा अनेक वेळा बेत आखला होता पण तो आयत्या वेळेला टांग देणाऱ्या मित्रांमुळे राहिला होता. आता पुन्हा हरिश्चंद्रगड सर करायचा बेत आखला होता ८-१० जण या बेतामध्ये सामील झाले, अगदी  ट्रेक ला जाण्याच्या आधल्या दिवशी ५-६  जण होती , उद्या हरिश्चंद्रगड सर करायचा या विचाराने मला झोप येत नव्हती,  ट्रेक ला जाण्याच्या दिवशी पहाटे कोणी न उठवता ४ वाजता उठायची सवयच झाली होती. हरिश्चंद्रगडाचा अनेक वेळा बेत फसल्यामुळे मनात फक्त एवढेच होते की घराच्या बाहेर निघायचे आहे मग आपोआप बेत फत्ते होईल, आणि अखेर तो दिवस उजाडला 11 डिसेंबर 2017., आणि ठरल्याप्रमाणे  सकाळी ५ ला घरातून निघालो ५.१५ ची घणसोली वरून ट्रेन पकडून ठाणे ला आलो, रात्री आम्ही ६ जण होतो, वास्तविक सकाळी आता आम्ही ३ च जण जागेवर हजर होतो . मी (वैभव),  सुजित आणि ऋषिकेश. ठरल्याप्रमाणे ठाणेवरून  ५:४५ च्या दरम्यान ची कल्याण ला जाणारी ट्रेन पकडली, कल्याण ला पोहचताच ६:१५ ची माळशेज घाट ला जाणारी ST लागली होती, नशिबाने वेळेत ST भेटली  व आमचा खरा प्रवास सुरु झाला.

BUS DEPO

ST बस


 आम्ही शेवटच्या सिटांवर बसलो होतो, आणि ST च्या शेवटच्या सिटचा अनुभव  बहुतेकांना असेलच , थंडीचे दिवस असल्याने सर्वत्र दाट धुके होते अगदी रस्त्यावर समोरचे काही स्पष्ट् दिसत नव्हते तरी ड्रायव्हर दाट धुक्यात सुसाट गाडी चालवत होता, काही वेळाने तो विरुद्ध दिशेच्या लेन ने हि सुसाट ओव्हरटेक करायला लागला , आम्ही आमच्यात अशीच गंमत  केली हा आज आपल्याला डायरेक्ट आपल्या destination ला पोहचवणार. 


साधारण ८:४५ च्या दरम्यान आम्ही खुबीफाट्याला पोहचलो.खुबीफाट्याला पोहचताच हरिश्चंद्रगडाची अफाट पर्वतरांग, खिरेश्वर डॅम चे मनमोहक दृश्य नजरेस पडले व कधी ते सर करतो असे झाले. 


खुबीफाट्यावरून हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचे अंतर साधारण ६-७ km होते अपेक्षेप्रमाणे आम्हाला तेथे जीप भेटली नाही, त्यामुळे वेळ न दवडता पायी चालून अंतर पार करायचे  ठरवले, अवघ्या दिड तासांनी आम्ही पायथ्याशी आलो. साधारण १०:१५ वाजले होते. ७ km पायी चालल्यामुळे थोडा थकवा जाणवत होता पण किल्ला सर करण्याच्या उत्साहापुढे थकवा टिकू शकला  नाही.. ट्रेकला सुरुवात करण्याआधी गावातील एक गृहस्थ आम्हाला वाटेत भेटले त्यांनाही गडावर काही अंतरापर्यंत जायचे होते त्यांची साथ आम्हाला काही अंतरापर्यंत लाभली, त्यांनी आम्हाला सांगितले गडावर तुम्ही जसे जसे वर जाल तुम्हाला २-२ वाटा दिसतील त्यामुळे भटकण्याची दाट शक्यता असते  तर प्रत्येक वेळी डाव्या बाजूच्या वाटेने पुढे जात राहायचे, त्यांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही डाव्या मार्गाचाच अवलंब करत पुढे जात राहिलो, वाटेत काही पॅच अवघड होते पण आम्ही ते पार करून वर वर जाऊ लागलो, खिरेश्वर मार्ग थोडा अवघड आहे असे ऐकले होते ४-६ तास चढायला लागतील असे,

त्याप्रमानेच साधारण १.३०-१.४५ वाजले होते आम्ही ते कठीण पॅच चढून वर आलो होतो आता पठारा सारखा भाग आला होेता वाटे नुसार सरळ चालायचे आहे असेच वाटत होते,  साधारण ५ तासाच्या ट्रेक नंतर प्रचंड थकवा जाणवत होता, पठारावर सर्वत्र दाट धुके पडले होते समोरचे अजिबात दिसत नव्हते आम्ही वाटेनुसार हळूहळू पुढे जाऊ लागलो पण अजूनही हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर दृष्टीस पडले नव्हते , आता मनात थोडी भीती निर्माण झाली होती- आपण मार्ग चुकलो तर नाही ना? पण त्यावर उपाय एकच दिसत होता पुढे जात राहणे त्यानुसार आम्ही पुढे चालत राहिलो , पूर्ण पठारावर कोणीच दिसत नव्हते आम्ही आवाज देण्याचा प्रयत्न केला पण  कोणी नव्हतेच! थोडे पुढे गेल्यावर आम्हाला काही गाई दृष्टीस पडल्या त्यावरून आम्ही विचार केला इथे नक्कीच आपल्याला कोणीतरी भेटेल आम्ही जोरात आवाज देण्यास सुरु केले कोणी आहे का? दूर वरून कोणाचा तरी आवाज आला त्यामुळे आम्ही पटकन त्यांच्या दिशेने जायला निघालो त्यांच्याकडे पोहचताच आम्ही त्यांना हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराकडे जाण्याच्या मार्गाची विचारणा केली त्यांनी समोरच खालच्या दिशेने बोट दाखवून म्हणाले हे बघा हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर.

TEMPLE


हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर


आणि हे बाजूला तारामती शिखर, दाट धुक्यामुळे सर्व काही धुक्यांनी पांघरले होते, आम्ही मंदिराजवळ विश्राम करून जेवण केले, मग आम्ही मंदिरामागील शिवलिंगा जवळ गेलो.

CAVE


शिवलिंग


शिवलिंगा जवळ गेल्यावर मंदिरातील साधूंनी आम्हाला या शिवलिंगाबद्दल सांगितले, या शिवलिंगा बाजूला जे खांब आहेत ते 4 युगांचे 4 खांब आहेत त्यातले 3 पडलेले खांब सतयुग, द्वापरयुग व त्रेतायुगाचे आहेत व जो 4 था शेवटचा खांब आहे तो कलयुगाचा तो पडला म्हणजे संपुर्ण सृष्टी🌍 चा विनाश🌋🌊. यावर किती विश्वास ठेवावा माहित नाही पण हे ऐकून आम्ही मंदिरासमोरील पुष्करणी येथे आलो.

CAVE

पुष्करणी 


 पण आता साधारण २.३० वाजत आले होते आणि कोकणकडा पहायला वेळही नव्हता , परत खिरेश्वर मार्गे उतरायचे मन होत नव्हते कारण थकवा हि आला होता आणि त्या मार्गाने उतरायला वेळही नव्हता खिरेश्वर मार्गे उतरायचे म्हणजे किमान 4-5 तास तरी लागणार होते आणि उतरूनही परत ६ ची बस भेटणे अशक्य वाटत होते त्यामुळे आता मंदिराजवळ मुक्काम च होणार अशी दाट शक्यता वाटत होती आणि तिघांच्या मोबाईल ची चार्जिंग हि संपत आली होती त्यामुळे आता खाली कसे जायचे यामुळे मनात भीती निर्माण झाली होती, पाचनई चा मार्ग सोपा होता त्यामुळे त्या मार्गाने उतरावे असे वाटत होते तिथे मंदिराजवळ असणाऱ्या व्यक्तीने सांगितले पाचनई वरून शेवटची बस ३.३०-४ च्या दरम्यान आहे आणि बस नाही भेटली तर लांब लांब पर्यंत दुसरी कोणती गाडी नाही त्यांनी सांगितले गाडी पाहिजे असेल तर २२०० रुपये तिघांचे कसारा पर्यंत लागतील तेवढे आमच्याकडे नव्हते आणि परवडणारे हि नव्हते. मंदिरात आम्हाला ३ मुले (ऋषिकेश, सौरभ, सुयोग) भेटले ते अकोले तालुक्यातील होते, ते पाचनई मार्गाने गडावर आले होते ते आम्हाला बोलले चला आपण उतरू पाचनई मार्गाने काही नाही भेटेल गाडी तसाही दुसरा पर्याय दिसत नव्हता, आम्ही त्यांच्यासोबतच पाचनई मार्गाने उतरायचे ठरवले उतरता उतरता एकमेकांची ओळख झाली साधारण एक तासात आम्ही खाली उतरलो साधारण ३.३० वाजले होते आम्ही खाली काहि घरात गाडीची विचारणा केली तर तिथे गाडी नाहीच असेच उत्तर मिळाले मग आता काय करावे तर ती अकोल्याची मुले होती ती बोलली आम्ही सोडतो बाईकवर गावातल्या बस स्टॉप पर्यंत , ते तिघे एका बाईक वर आले होते,

STRANGERS

अनोळखी 


 असे खूप कमी असतील जे अनोळखी लोकांना मदत करतील त्यातले ते एक होते, त्यांच्यातल्या सौरभ ने आम्हाला बस स्टॉप जवळ सोडले व तो परत मागे निघून गेला ऋषिकेश आणि सुयोग ला आणायला,  तो गेला आणि  आमच्या दृष्टीस ST लागली आणि ती फक्त दृष्टीसच लागली कारण काही पावलांच्या अंतरावर असतानाच ती निघून गेली जसे क्रिकेट मॅच मध्ये एका धावेचे महत्व तेव्हा कळते जेव्हा मॅच टाय होते तसेच त्या एका क्षणाचे महत्व समजले. ती कदाचित शेवटची बस होती तिथे पायथ्याला एका आजीची छोटी टपरी होती तिथे आजींना बस बद्दल विचारपूस केली तर त्या म्हणाल्या हि गेली तीच शेवटची बस होती पण आज बाजार आहे तर ४.३०-५ दरम्यान जादा बस येऊ शकते ते ऐकून जरा बरे वाटले पण 1 तासा पेक्षा जास्त वेळ बाकी होता काय करायचे काय नाय यात काही वेळ गेला आणि आम्ही पायी पुढे जायचे ठरवले काही अंतर पुढे गेल्यावर मागून गाडीवर ऋषिकेश ,सौरभ, सुयोग आले ते बोलले आम्ही पुढे जाऊन गाडीची काही विचारपूस करतो आम्ही ठीक आहे बोललो आणि ते गेले.

आमच्यासमोर आता चालण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता, वाटेत आम्ही एका माणसास विचारले बस कुठे भेटेल तो बोलला खर्डी ला साधारण 2-3 KM अंतरावर आहे आम्ही 1-2 KM पुढे गेल्यावर एका बाईला विचारले खर्डी किती लांब आहे ती बोलली 2 KM असे वाटेत अनेक जणांना विचारले खालची खर्डी वरची खर्डी पण कोणाचे ते 2 KM काय संपत नव्हते साधारण 10 KM पेक्षा पुढे आलो होतो शेवटी बस स्टॉप भेटला पण बस चा काय पत्ता दिसत नव्हता असाच बसची वाट बघत बसलो होतो तितक्यात समोर नजर  गेली तर बघतो तर काय सुयोग बाईक वरून येत होता तो  ५-१०KM पुढे जाऊन परत मागे आम्हाला घेयला आला होता, विश्वास बसत नव्हता... त्याच्या सोबत बाईक वर आम्ही पुढे निघालो तो बोलला अरे आम्ही पुढे विचारपूस केली आता गावात बस किंवा कोणती गाडी येणारच नाहीय मग तुम्ही उगाच इथे फसला असता म्हणून मी घेयला आलो.

FRIENDS

मित्र 


  अनोळखी व्यक्ती अशी कोणी मदत करू शकते असा विश्वास बसत नव्हता. या मदतीचे मुल्य पैशात करणे अशक्य होते, पुढे एका टपरी जवळ गेलो तिथे त्यांनी एक गाडी जीप बघून ठेवली होती तिथे त्यांच्यासोबत चहा आणि पाववडा खाल्ला टेन्शन मध्ये इतके होतो कि सोबत फोटो काढायचा भान नाही राहिले 
परंतु नशीब एकमेकांचे नंबर तरी घेतले आणि ते अकोल्याकडे निघाले व आम्ही कसाऱ्याकडे. कसाऱ्याजवळ पोहचताच आम्ही एका हॉटेल मध्ये चहा पिलो, 

ENERGY

चहा 


मग कसाऱ्यावरून ठाणे ला जाण्यासाठी एखाद्या गाडीची वाट बघत होतो थोड्याच वेळात एक जीप भेटली व ठाणे ला जाण्यासाठी निघालो, आता खूप बरे वाटत होते कारण एका क्षणी असे वाटत होते कि कुठेतरी आज मुक्काम च होईल, परंतु आता घरी जात होतो. आता गाडीत आजच्या पूर्ण दिवसाबद्दल चर्चा करत होतो. 10.30 च्या आसपास आम्ही ठाणे ला पोहचलो, आता घरी जाता जाता पुढचा ट्रेक जवळच करू😂😂 असे ऋषिकेश आणि सुजित बोलला. 11 पर्यंत सर्वजण घरी पोहचलो व अश्या प्रकारे हरिश्चंद्रगडाचा बेत पूर्ण झाला, कोकणकडा व तारामती वर जाऊ नाही शकलो याचे वाईट वाटत होते परंतु 3 नवीन मित्र झाल्याचा आनंद त्यापेक्षाही जास्त होता, आता पुन्हा सोबत ट्रेक करण्यासाठी, सोबत फोटो काढण्यासाठी नवीन ट्रेक ची आतुरतेने वाट बघत आहे😉.


Comments

Popular Posts