KALSUBAI {Maharashtra}
Kalsubai (महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट)
कळसूबाई शिखर हे नाव शाळेमध्ये असताना भूगोलाच्या पुस्तकात वाचले होते, तेव्हा पासूनच ते सर करण्याची त्यास पाहण्याची प्रचंड उत्कंठा होती.
कळसूबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे त्यास महाराष्ट्राचे 'माउंट एव्हरेस्ट' असेही बोलतात.कळसूबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. कळसूबाई शिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची ५४०० फूट म्हणजे १६४६ मीटर आहे. शिखरावर जाण्याचा मुख्य मार्ग भंडारदरऱ्यापासून ६ किलोमीटर असलेल्या बारी गावापासून होतो. नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते.
मी कळसुबाई तसे याआधीही एकदा सर केले होते ते पाहून माझे मित्र मला म्हणाले कि आपण पुन्हा कळसुबाई ला जाऊया ते ऐकून मी त्यांना लगेच होकार दिला कारण मी कळसुबाई हिवाळ्यात सर केला होता आणि आता पावसाळा आहे मला कळसुबाई पावसाळ्यात सर करायचा होता. ठरल्याप्रमाणे ३ जुलै २०१७ रोजी सकाळी सत्यजित, विनय, संकेत आणि मी (वैभव) सकाळी ४.३० च्या सुमारास घणसोली वरून ठाणे येथे येण्यास निघालो. मी, सत्यजित आणि विनय आम्ही याआधीही काही ट्रेक केले होते परंतु संकेत हा अगदी नवखा होता. त्याच्या मनात नक्कीच वेगवेगळे प्रश्न येत होते. मी त्याला म्हणालो टेन्शन नको घेऊस तुझा पहिला ट्रेक कळसुबाई असणार आहे हा विचार कर. ठाणे स्टेशन वरून ५.४० च्या सुमारास आम्ही इगतपुरी ला जाणारी साकेत एक्सप्रेस पकडली. ८ वाजता आम्ही इगतपुरीत पोहचलो होतो.
इगतपुरी रेल्वे स्टेशन पासून चालत दहा मिनिटांच्या अंतरावर एसटी बस स्टॉप आहे. तिथे गेल्यावर आम्ही घोटी ला जाणारी एसटी पकडली. अगदी काही मिनिटांत आम्ही घोटी येथे दाखल झालो. तेथून बारी या गावात जाण्यासाठी जीप करावी लागते. आम्ही एका जीप मध्ये बसलो व १.३० तासाच्या प्रवासानंतर आम्ही बारी गावात पोहचलो.पावसाच्या वातावरणामुळे शिखराचे टोक काळसूबाईचे मंदिर ढगांमागे झाकले गेले होते. परंतु ते दृश्य कोणालाही आपल्या प्रेमात पाडेल असे होते.
शिखर गाठल्यानंतर स्वर्गाची अनुभूती होईल असे वाटत होते. १०.३० च्या आसपास आम्ही शिखर सर करण्यास सुरुवात केली सुरुवात करताच आम्हाला रस्त्यात १ ओढा लागला ओढ्या च्या पाण्यात जाण्याची ओढ तर खूप होती पण उतरताना ओढ्यात जाण्याचे ठरवले, व शिखरावर चढाई सुरु केली, पुढे अजून १ ओढा लागला तो चालत पार करायचा होता. संकेत चा हा पहिला ट्रेक असल्यांने तो मध्ये मध्ये थांबत होता. शिखराच्या मध्यापर्यंत पोहचल्यानंतर दोन लोखंडी शिड्या लागतात त्या पार केल्यानंतर अचानक जोरात पाऊस येऊ लागला आम्ही आडोशाला थांबलो होतो.
आम्ही पावसात भिजत जाण्याचा निर्णय घेतला तसे माझ्याकडे जॅकेट होते संकेत ने पावसात छत्री उघडली वारा हि खूप जोरात असल्याने त्याची छत्री काही सेकंदातच उलटी झाली. आम्ही त्याच्यावर खूप हसलो कदाचित अशी कामे तोच करू शकतो त्याने छत्री जी आणली होती सोबत. तो मला सारखे विचारत होता अजून किती बाकी आहे अजून किती वेळ लागेल वर पोहचायला मी त्याला धीर देण्यासाठी जवळ आले आहे लवकरच पोहचू असे धीर देत होतो. असे करता करता आम्ही ४ तासाच्या चढाई नंतर वर पोहचलो. वर गेल्यानंतर खूप जोराचा वारा होता धुकेही खूप होते आजूबाजूचे ही काहीच दिसत नव्हते. आम्ही पावसात भिजल्यामुळे थंडी खूप वाजत होती आणि वर खूप जोराचा वारा होता. आम्हाला उभेही राहवत नव्हते असा वारा होता आम्ही कसेबसे खाली पकडून मंदिराच्या आडोशाला बसलो.
शिखरावर पोहचल्यानंतर तिथून पाय हलतच नव्हते तिथेच थांबावे असे वाटत होते. शिखरावर थोडा वेळ व्यस्त केल्यानंतर आम्ही उतरण्यास सुरुवात केली. आम्ही ३ वाजता उतरण्यास सुरुवात केली. चढताना जो संकेत सारखा थांबत होता तोच उतरणारा सर्वात पुढे पळत होता. ४.३० च्या आसपास आम्ही ओढया जवळ पोहचलो आता मात्र त्यात जाण्याचा मोह राहवला नाही व १ तास त्या ओढ्यात वेळ व्यस्त केला.
त्यांनतर शिखराच्या पायथ्याशी पोहचलो. तिथे चहा प्राशन केला व नाश्ता केला.
पायथ्यापासून लगेच आम्हाला घोटी ला जायला जीप भेटली. जीप मध्ये आत जागा नसल्याने आम्ही टपावर बसलो. त्यात नंतर पाऊस पडल्याने टपावर अत्यंत वेगळा प्रसंग जाणवला.
अशाप्रकारे इगतपुरी वरून ट्रेन पकडून १० च्या सुमारास आम्ही ठाणे येथे पोहचलो. अशाप्रकारे हा सफर खूप चांगल्यारित्या पूर्ण झाला, व पुढील सफर कुठे कधी याची चर्चा सुरु झाली.
Comments